अजय देवगण अभिनित तानाजी:द अनसंग वारियर हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. सर्वत्र फक्त तान्हाजी या चित्रपटाचीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा ते या चित्रपटाच्या नावापर्यंत काही सूक्ष्म बदल निर्माता अजय देवगण याने केले आहेत.
आणि यासाठी तान्हाजी मालुसरे यांच्या थेट बाराव्या वंशज डॉ. शीतल मालुसरे ज्या आता महाड, सिंधुदुर्ग येथे वास्तव्यास आहेत यांचा सल्ला घेतला होता. शीतल या शिक्षिका आहेत आणि त्यांनी तान्हाजी मालुसरे यांच्यावर पीएच. डी. प्राप्त केली आहे. त्याचबरोबर त्या तान्हाजी यांच्या पराक्रमाविषयी व्याख्यानेसुद्धा देतात.
तान्हाजी का तानाजी?
तान्हाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तान्हाजी मालुसरे यांचे नाव तान्हाजी कि तानाजी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काही इतिहास जाणकारांनी तानाजी तर काही तान्हाजी असे नाव असल्याचे सांगितले.
त्यामुळे या चित्रपटाचे नाव नेमके कोणते असावे याचा प्रश्न निर्माता अजय देवगन यांना पडला होता. दरम्यान निर्मात्यांनी तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज असलेल्या डॉ शीतल मालुसरे यांना विचारणा केली असता तान्हाजी मालुसरे असे नाव समोर आले आणि पुन्हा हेच शीर्षक या चित्रपटाला देण्यात आले.
म्हणून तान्हाजी हेच नाव बरोबर
डॉ. शीतल मालुसरे म्हणाल्या कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी नरवीर तान्हाजींच्या पार्थिवावर ठेवलेली समुद्रकवड्यांची ऐतिहासिक राजमाळ याबद्दल आपल्याला दाखला देते.
कोंढाण्याची मोहीम फत्ते केल्यानंतर बक्षीस म्हणून देण्याची ठरलेली समुद्रकवड्यांची ऐतिहासिक राजमाळ ज्यावेळी शिवरायांनी तान्हाजीच्या पार्थिवावर ठेवली होती त्यावेळी गड आला; पण माझा सिंह गेला.. तान्हा गेला असे भावूक उद्गार शिवरायांच्या मुखातून आले होते.
त्यामुळे तान्हाजी हेच नाव अगदी योग्य आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक डॉ. शीतल यांनी यावेळी दिली.
वाशीम येथील मराठीचे प्राध्यापक असलेले आणि जेष्ठ पत्रकार गजानन वाघ यांनीही या गोष्टीला समर्थन दिले. प्रा. वाघ म्हणाले कि, तान्हाजी हा काही वेगळा शब्द नाही तर तान्हे या मूळ शब्दावरून तान्हाजी हा शब्द तयार झाला आहे.
हे एक व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याला शेवटी जी लावण्यात आले. हिंदू किंवा उर्दूमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आदरभाव व्यक्त करायचा असेल तर त्याच्या नावाच्या शेवटी जी लावले जाते. आणि याचा प्रभाव मराठी भाषेवर देखील आपल्याला पाहायला मिळतो.
घोरपडीचा प्रसंग
इतिहासानुसार घोरपडीच्या मदतीने तान्हाजी मालुसरे यांनी गड सर केल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु मुळामध्ये तान्हानी मालुसरे यांनी घोरपडीच्या मदतीने नव्हे, तर स्वतः गड सर केला होता. परंतु इतिहासकारांनी चुकीची नोंद करून घोरपड मध्येच घुसवली.
डॉ. शीतल मालुसरे यांनी चित्रपट निर्मात्यांना हिसुद्धा गोष्ट निदर्शनास आणून दिली. म्हणून चित्रपटामधील घोरपडीचा सीन काढून त्या ठिकाणी स्वतः तान्हाजी गड सर करतात हे दाखवण्यात आले आहे.